महापालिकेच्या नव्याने विकसित होणाऱ्या उद्यानांमध्ये खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी दीड कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. महापालिका हद्दीत एकूण 175 उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये महापालिकेमार्फत घसरगुंडी, सी-सॉ, झोके, फनेलरोप क्लाइंबर, डबल आर्च स्विंग, मेरी गो राउंड अशी विविध खेळणी बसविण्यात आली आहेत.
उद्यान विभागासाठी आवश्यक असणारी खेळणी विभागामार्फत वेळोवेळी निविदा पद्धतीने खरेदी करण्यात येतात त्यानुसार तीन वर्षांसाठी निविदा मागवून अरिहंत इंडस्ट्रिज यांना अंदाजपत्रकीय चार कोटींपेक्षा तीन टक्के कमी म्हणजेच 3 कोटी 88 लाख रुपये दराने कामाचे आदेश दिले आहेत. नुकतीच महापालिकेची सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. काही उद्याने नव्याने विकसित करण्यात आली आहेत.
स्थापत्य, उद्यान विभागामार्फत काही उद्याने नव्याने विकसित करण्यात आली आहेत. ती नागरिकांसाठी खुली करायची आहेत. या उद्यानांमध्ये नव्याने खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कामास तीन महिने कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे, तसेच दीड कोटी रुपयापर्यंत नवीन खेळणी खरेदी करण्यात येणार आहे.
- खेळणीदुरुस्तीसाठी एक कोटी
महापालिकेच्या विविध उद्यानांमधील तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील खेळणीदुरुस्ती स्पेअरपार्ट पुरविणे बसविणे आणि देखभालीसाठी सन 2018-19 मध्ये निविदा काढली होती. तीन वर्षे कालावधीसाठी ही निविदा काढण्यात आली. त्यासाठी 2 मार्च 2019 रोजी कामाचे आदेश दिले. हे काम अरिहंत इंडस्ट्रिज यांनाच देण्यात आले. सध्या काही उद्यानांमधील खेळणी तुटलेली आढळली. सी-सॉ घसरगुंडी, झोका अशा विविध प्रकारच्या खेळण्यांचा त्यामध्ये समावेश आहे. खेळणी तुटलेली असल्याने बच्चे कंपनीला ही खेळणी खेळता येत नाहीत. शाळांना उन्हाळ्याची सुटी लागल्यानंतर उद्यानांत गर्दी वाढेल. त्यामुळे ही खेळणी महापालिका उद्यान विभागाकडून तातडीने दुरुस्त केली जाणार आहेत. त्यानुसार, ठेकेदाराला एक वर्षे कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे. या खेळणीदुरुस्तीसाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहेत.