
तळेगाव स्टेशन (वार्ताहर) समाजातील अज्ञान व दारिद्र्य संपविण्यासाठी शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे. आजही प्राथमिक शिक्षणानंतर निम्म्याहून अधिक विद्यार्थी शाळा सोडत आहेत. ही गळती रोखण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे, अशी अपेक्षा मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी व्यक्त केली.
यशोदा महादेव काकडे नूतन वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी कृष्णराव भेगडे बोलत होते. यावेळी माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, दिगंबर भेगडे, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कृष्णराव भेगडे पुढे बोलताना म्हणाले, की मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना महाविद्यालयाअभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. आता नव्या पिढीकडे संस्थेची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहेत. ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन, तर इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी आभार मानले.
