ठाणे मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. सरकारने भोंगे उतरविले नाही तर अशा मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवा, असा आदेश राज यांनी मनसैनिकांना दिला आणि आक्रमक हिंदूत्वाचा पुरस्कार केला. दरम्यान यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत राज ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं जाहीर आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. “मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका,” असं ही यावेळी आव्हाड म्हणाले.