मुंबई : मशिदींवरील भोंगे उतरविण्याची मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली असता भाजप नेत्यांनी त्याला सहमती दर्शविली. तसेच भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये मशिदींवरील भोंगे कायम आहेत. भोंगे हटविण्याचा निर्णय कोणत्याही भाजपशासित राज्यांमध्ये झालेला नाही. त्यामुळे राज्यात भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणा, गोवा, ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर , त्रिपुरा आदी राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. भाजपशासित राज्यांमध्ये कोठेही आजान किंवा मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा निर्णय झालेला नाही. उत्तर प्रदेशात भाजप सरकारच्या पहिल्या कारकीर्दीत मशिदींवरील भोग्यांवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. तेव्हा भाजपच्या काही मंत्र्यांनी बंदीचा विचार करण्यात येत असल्याचे सूतोवाच केले होते.
पण योगी आदित्यनाथ सरकारने आजान किंवा भोंग्यावर अद्याप तरी बंदी घातलेली नाही. गुजरात राज्यातही अशा प्रकारची बंदी नाही. अलीकडेच फेब्रुवारीमध्ये गांधीनगरमधील एका नागरिकाने मशिदींवरील भोंग्यांवर बदी घालावी म्हणून उच्च न्यायालयात धाव घेतली असता, उच्च न्यायालयाने गुजरात सरकारला भूमिका मांडण्यासाठी नोटीस बजाविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक वाजविण्याबाबत स्पष्ट आदेश दिला आहे. त्यात भोंग्यावर बंदीचा समावेश नाही याकडे लक्ष वेधण्यात येते.