पुणे, दि. 6 – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2018 च्या परीक्षेतील गैरव्यवहारात यापूर्वी अटक आरोपी स्वप्नील पाटील याच्याकडे 40 अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी त्यांची माहिती व पैसे देणाऱ्याला तसेच इतर एजंटांकडे यादी व पैसे देणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना दि. 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.]
कलीम गुलशेर खान (वय 52, रा. बुलडाणा) आणि राजेंद्र विनायक सोळुंके (वय 52 , रा. नांदगाव,नाशिक) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय गोविंद जगताप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. स्वप्नील पाटील याने एजंटामार्फत परीक्षेतील 150 अपात्र परीक्षार्थींची माहिती जमा करून ती पुढे एजंट संतोष हरकळ याच्याकडे नोव्हेंबर 2018 मध्ये दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
यातील सोळुंके याने 40 अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्यासाठी त्यांची माहिती व पैसे पाटील याला दिले आहेत. तर खानसह इतर पाच आरोपींनी 150 अपात्र विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे पैसे हरकळ याला दिले आहेत. खान याने हरकळला एक कोटी रुपये दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.



