पिंपरी – शहराचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाचे पथक शहरामध्ये दाखल झाले आहे. त्यांच्यामार्फत शहरामध्ये स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले आहे. परंतु महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली केवळ बनवाबनवी सुरू आहे. पथक येण्यापूर्वी सुशोभीकरण आणि वेगवेगळ्या सुविधा स्थापन केल्या जातात. पथक पाहणी करुन गेले की तात्पुरत्या स्वरुपाचे सुशोभीकरण आणि सुविधा तातडीने दुसऱ्या ठिकाणी हलविली जाते.

केंद्रीय पथकाकडून पाहणीचा केवळ फार्स
शहरांच्या केंद्रीय सर्वेक्षणात नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या पेयजल, सांडपाणी, घनकचरा निर्मूलन सेवा, उघड्यावर हागणदारी थांबली आहे की नाही इत्यादी व्यवस्था कशा आहेत, नागरिकांना त्याबद्दल काय वाटते व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता आहे का अशा गोष्टींवर स्वच्छतेची गुणवत्ता ठरविली जाते. सेवा कशी आहे, हे समजण्याकरिता काही नागरिकांकडून मतेसुद्धा मागवली जातात. परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान येथे सर्वेक्षणास आलेल्या पथकाने एकाही नागरिकाशी संपर्क साधला नाही.
महापालिकेला जास्त गुण मिळावे म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान पेठ क्रमांक 18, महात्मा फुलेनगर (फ प्रभाग) येथे एक दिवसाकरिता संपूर्ण उद्यान व सार्वजनिक शौचालय सुशोभित करण्यात आले होते. केंद्रीय पथकाने तपासणी केली. तपासणी करून पथक रवाना होताच काही क्षणातच तात्पुरत्या स्वरूपात केलेले सुशोभीकरण व सेवा सुविधा काढून नेण्यात आल्या.
फोटोमध्ये दिसत असलेल्या झाडांच्या कुंड्या, विविध कलाकृती, सार्वजनिक शौचालयात असलेले ऑटोमॅटिक कंडोम मशीन, आरसा, नॅपकिन, कचराकुंडी, दिव्यांगांसाठी असलेली सुविधा आणि त्या शौचालयात असलेले पूर्वीचे बकेटसह सर्व वस्तू महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गायब केले. त्यामुळे ही सर्व व्यवस्था फक्त फोटो सेशन करिता होती का? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.




