पुणे, दि. 6 – बलात्कार प्रकरणात अल्पवयीन पीडित आणि फिर्यादी असलेली तिची बहिण फितुर होऊनही न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा आदेश दिला आहे. डीएनए तपासणीवरून आरोपीच्या गर्भाचा जनुकीय पिता असल्याचे निष्पन्न झाल्याचा पुरावा आणि मुस्कान संस्थेच्या समुपदेशिकांची साक्ष महत्त्वाची ठरली.
पीडितेचे आणि तिचे लग्न झाले असून, पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा बचाव आरोपीच्या बाजूने घेण्यात आला. मात्र, लग्न झाल्याचा ठोस पुरावा न्यायालयासमोर आलेला नाही. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली.
अरबाज नदाफ (वय 21, रा. कोंढवा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रह्मे यांनी पाच साक्षीदार तपसले. तर विशेष सरकारी वकील मारुती वाडेकर यांनी युक्तीवाद केला. पोलीस उपनिरीक्षक वैशाली आजगेकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी कर्मचारी एस.ए.पाटील आणि एस.एल.डोंगरे यांनी मदत केली. दरम्यान, खोटी साक्ष दिल्याबद्दल पीडित आणि फिर्यादीवर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
एप्रिल 2020 मध्ये पीडितेला दवाखान्यात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी करोनामुळे तपासणी न करता किरकोळ औषधी दिल्या. जुलैमध्ये सोनोग्राफी केली असता ती सात महिन्याची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशी केली असता, आरोपी आणि तिची इन्स्ट्राग्रामवरून ओळख झाली. त्याने लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, आरोपीने घटनेची जबाबदारी नाकारली आणि गर्भपात करण्यास सांगितले. पीडित लहान असल्याने ससून रुग्णालयाने तिला मुस्कान संस्थेकडे पाठवले. सामाजिक कार्यकर्त्यांनी धीर दिल्यानंतर खडक पोलिसांत फिर्याद देण्यात आली.