राष्ट्रवादी काॅंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आंदोलन करण्यास सुरवात केली. एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाचा मुद्दा रेटत आज कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. या मागणीबाबत आंदोलकांमधील एका ग्रुपने आक्रमक भूमिका घेत सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन सुरू केले.
अचानकपणे आंदोलनकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढे येत सामंजस्याने यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी वारंवार “शांततेत चर्चा करू” असे आवाहन करून सुद्धा त्यावर कोणताच प्रतिसाद न देता आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. अखेर या गोंधळातील वातावरणाला निराश होत सुप्रिया सुळे यांनी माघारी परतण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानकपणे केलेल्या आंदोलनाने राज्यात मात्र एकच खळबळ उडाली असून त्यावर उलट सूलट चर्चा होऊ लागल्या आहेत. दरम्यान, कालच उच्च न्यायालयाने आपली भूमिका स्पष्ट करत एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिल पर्यंत रुजू व्हावे असे सांगितले असून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे.


