पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमचे आदरणीय नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी नियोजितपणे समाजकंटक व्यक्तींनी हल्ला केला. मा. न्यायालयाचा निर्णय झाला. त्यानंतर तो निर्णय मान्य करणे क्रमप्राप्त आहे. आंदोलनाचा मुलामा देत अशा पध्दतीने शरदचंद्र पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करून आणि हल्ला करण्याचे गैरकृत्य करण्यात आले. नियोजितपणे हा हल्ला केलेला असून हा प्रकार निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीला न शोभणारा आहे. अशा शब्दात माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी निषेध नोंदवला.
यामागे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकाला अस्थिर करण्याचा जो प्रयत्न सातत्याने सुरू आहे. हा हल्ला देखील त्याचा भाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनाला वेगळं वळण देण्याचं काम काही मंडळींनी केल्याचे यावरून स्पष्ट होते. महाराष्ट्रातील शांतता व कायदा सुव्यवस्था भंग करत असून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. या सर्व प्रकरणाची मुंबई पोलीस व महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने सखोल चौकशी करावी. या संपूर्ण हल्ल्यामागील कर्ते करविते कोण, याचा सोक्षमोक्ष लावावा.




