पिंपरी – दोन महिन्यांपूर्वी वडमुखवाडी, चऱ्होली येथे झालेल्या डुक्कर बॉम्बच्या स्फोटात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या आईला त्या परिसरात पुन्हा तसेच बॉम्ब दिसले. पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता परिसरात शुक्रवारी (दि. 8) आणखी 12 डुक्कर बॉम्ब सापडले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुपारी एवढ्या आकाराच्या दोरा गुंडाळलेली वस्तू फोडत असताना चऱ्होली, वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटीजवळच्या नानाश्री हॉटलेमागे गाईच्या गोठ्याजवळ 5 फेब्रुवारी 2022 रोजी डुक्कर बॉम्बचा स्फोट होऊन राधा गोकुळ गवळी (वय 5) या बालिकेचा मृत्यू झाला होता. तर राजेश महेश गवळी (वय 4) आणि आरती गोकुळ गवळी (वय 4) ही दोन मुले गंभीर जखमी झाली होती. हे बॉम्ब येथून जवळच राहणाऱ्या झोपडीतील दोन तरुणांनी तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार येथील झोपड्या उठविण्यात आल्या.
दिघी पोलीस आणि पुण्यातील बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरात शोध घेतला असता त्यांना पुन्हा 12 डुक्कर बॉम्ब मिळून आले. हे बॉम्ब फेब्रुवारी महिन्यातील त्या घटनेच्या वेळीचे असावेत, अशी शक्यता दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप शिंदे यांनी व्यक्त केली.



