भोसरी – राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटणे आणि भूमिपूत्रांना तसेच बांधकाम व्यवसायिकांना वेठीस धरत स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्या आमदार महेश लांडगे यांनी इतरांच्या विकासकामाचे श्रेय लाटण्याचा प्रकार बंद करावा, असा टोला भरत लांडगे यांनी लगावला आहे.
भोसरी विधानसभेतील रेडीरेकनरचे दर कमी झाल्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या व्हिजन 2020 चे पितळ उघडे पडल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली होती. त्याला उत्तर भाजपचे कार्यकर्ते रणजित गव्हाणे यांनी दिले होते. त्याला आता भरत लांडगे यांनी उत्तर दिल्याने भोसरीमध्ये राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे.
भरत लांडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकास राष्ट्रवादीने केला हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. भाजपाचे कारभारी म्हणवून घेणाऱ्या आमदार महेश लांडगे यांनी आपल्या आमदारकीच्या आठ वर्षांच्या काळात काय विकासकामे केली ती जनतेसमोर मांडावीत. विलास लांडे यांच्यावर टीका करणाऱ्या महेश लांडगे यांना समाविष्ट गावात काम करण्यासाठी अधिक काळ संधी मिळाली.
सन 2009 साली विकास आराखडा मंजूर झाल्यानंतर आमदार म्हणून विलास लांडे यांना विकास करण्यासाठी पाच वर्षे तर महेश लांडगे यांना आठ वर्षे वेळ मिळाला. तरीही विलास लांडे यांना जबाबदार धरणे म्हणजे आपले अपयश लपविणेच म्हणावे लागेल. आमदार महेश लांडगे यांना गेल्या आठ वर्षांत भोसरी मतदारसंघात एकही प्रकल्प उभा करता न आल्यामुळे राष्ट्रवादीने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. जलतरण तलाव, स्केटींग ग्राऊंड, संतपीठ, न्यायालयाची इमारत, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, थोरल्या पादुका समूह शिल्प, उद्याने ही कामे कोणाच्या काळात सुरू झाली हे सर्वसामान्य जनतेला ज्ञात आहे. वरील कामांवर तारखासह चर्चा करण्यास मी तयार असून आमदार महेश लांडगे यांनी आमचे खुले आव्हान स्वीकारावे असेही या पत्रकात लांडगे यांनी म्हटले आहे.




