
मुंबईला फिरायला चाललेल्या पुण्यातील चार विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवर गहुंजे येथे स्कोडा कारचा भीषण अपघात होऊन यामध्ये चार विद्यार्थी जागीच ठार झाले. भरधाव कार रस्त्याकडेला थांबलेल्या नादुरुस्त ट्रकला धडकून हा अपघात झाला. आज ( दि.09) दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.
शिवम राहुल कोकाटे (वय 19, रा. पुणे), प्रियम सत्येंद्र राठी (वय 20, रा. नारायण पेठ, पुणे), ऋषिकेश शिंदे (वय 21, रा. बिबवेवाडी, पुणे) आणि मोहनिस संगम विश्वकर्मा (वय 20, रा. धनवडी, पुणे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नावे आहेत.
शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीनच्या सुमारास स्कोडा कार भरधाव वेगाने जात असताना रस्त्याकडेला थांबलेल्या ट्रकला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चुराडा झाला असून, आतमधील चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले.




