पिंपरी : मागील काही दिवसापासून पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सुरू होते. सर्वात शेवटी उडान फुलापासून शगुन चौकाकडे जाणारा रस्ता काही दिवस कामासाठी बंद होता. 20 फेब्रुवारी रोजी पुलावरून शगून चौकाकडी जाणारा मार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव वाहतुकीस बंद केला. तब्बल 50 दिवसानंतर या उड्डाण पुलाचे सर्व मार्ग वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत. यामुळे रेल्वेउड्डाणपूल परिसरातील वाहतूक कोंडी दुर होण्यास मदत होणार आहे. आज (सोमवारी, दि. 11) सकाळी हा मार्ग खुला करण्यात आला.
पिंपरी कॅम्प व गावठाणासह काळेवाडी, पिंपळे सौदागर परिसरात जाण्यासाठी इंदिरा गांधी रेल्वेउड्डाणपूल महत्त्वाचा आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी पुलावरून शगून चौकाकडी जाणारा मार्ग वाहतुकीस बंद केला होता. त्यासाठी वाहतुकीत बदल करून, रिव्हर रोडने दुहेरी वाहतूक सुरू केली. त्यामुळे पुलावरून लिंकरोडच्या दिशेने वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
इंदिरा गांधी उड्डाणपुलाला चार मार्गिका आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी चौक, मोरवाडी चौक, कॅम्पातील शगून चौक आणि लिंक रस्त्यावरील भाटनगर चौक जोडले गेले आहेत. हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने त्याची गेल्या वर्षापासून टप्प्याटप्प्याने दुरुस्ती सुरू होती. अखेर आज शगुन चौकाकडे जाणारा मार्ग 50 दिवसांच्या कामानंतर खुला केला आहे. तरीही पुलाचे शगुन चौकाकडे खाली उतरताना संरक्षक भिंतीचे काम उरलेले आहे.




