नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला गंभीर घटना आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला, त्यांनी हे काम केले नाही. हल्ला करणारे संपकरी खरेच एसटी कर्मचारी होते की त्यांना कुणीतरी पाठवलं? याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे, असे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे नमुद केले. हल्ला करणारे घराच्या आत आले असते तर काय घडले असते, याचा विचारही करू शकत नाही असे म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांना इजा पोहोचविण्याचा डाव असल्याची ट्विटमधून व्यक्त केलेली शंका योग्य असल्याचे ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार दहशतवाद पसरवित आहे, या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. सरकार असे काही करत नाही, उलट महाविकास आघाडीतील नेतेच ईडीने शोषित आहेत. त्यामुळे सध्या सहन करण्याचेच काम सुरू आहे. कुणी वाईट वागणूक दिली, म्हणून आम्ही देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ला सेनेचा डाव असल्याचा माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आरोपही पाटील यांनी खोडून काढला. पवार महाविकास आघाडीचे आधारस्तंभ असून आघाडीतील एकही पक्ष अशी कृती करणार नाही, उरलेल्या पक्षाकडून असे काम होते की नाही, याची माहिती चौकशीत पुढे येईल, असे नमुद करीत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवरही निशाना साधला.


