लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेसाठी आलेल्या एका भाविकांचा मोबाईल चोरीच्या किरकोळ कारणावरून ९ एप्रिलच्या रात्री १ वाजता खून करण्यात आला होता. हा खूनाचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेत अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस व एलसीबी पथक पुणे ग्रामीण यांच्या पथकाने समन्वय साधत हा गुन्हा उघडकीस आणला असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी सांगितले.
प्रविण धर्माजी पाटील व अजय प्रविण पाटील (दोघेही राहणार पेण, जिल्हा रायगड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आई एकविरा देवीच्या यात्रा सुरु असताना वेहेरगाव येथील तळ्याजवळ एकविरा धामच्या गेटसमोर खेळ सुरु होता. हा खेळ पहात असताना कार्तिक म्हात्रे (रा. कोपरीगाव ठाणे) याचा मोबाईल चोरीस गेला. त्यावेळी म्हात्रे या प्रकरणातील तक्रारदार व मयत झालेले मनोज कुंडलिक पाटील (वय ४९, रा. कोपरी, ठाणे) यांनी सदर फोन हा खेळ करणारे व त्यांचे साथीदार यांनीच घेतला असल्याचे म्हंणत विचारणा केल्याच्या कारणावरून खेळ करणार्या त्या व्यक्तीने संगनमत करत तक्रारदार व त्याचे सोबतचे सहकारी यांना शिवीगाळ करून बांबूने मारहाण करुन व तिक्ष्ण हत्याराने हल्ला केला. यामध्ये मनोज पाटील मयत झाले तर हर्षल पाटील यास जखमी करुन राहूल पाटील यास जिवे मारण्याचा प्रयत्न करून फरार झाले.
राहुल भास्कर पाटील (रा. कोपरीगांव ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ अनोळखी 4 लोकांचे विरुध्द लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. ५३/२०२२ कलम ३०२, ३०७, ३२४, ३२३, ५०४, ३४ भा.द.वि. प्रमाणे खुन व खुनाचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केला. यात्रेत घडलेल्या या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व लोणावळा विभागाचे पोलीस उप अधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दोन टिम तयार करत घटनास्थळाची बारकाईने माहिती घेत शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा व शोध घेतला घेतला असता मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रविण पाटील (रा. पेण) या ताब्यात घेत खाक्या दाखवताच त्यांचे खूनाची कबूली दिली तसेच सह आरोपी असलेल्या अजय पाटील याला ताब्यात घेण्यात आले. दोघांनी खूनाची कबुली दिली आहे. सध्या ते दोघेही पोलीस कस्टडीत असून त्याचे इतर साथीदार यांचा शोध तसेच यांच्यावर पुर्वी असे काही गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.
पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण बा. मोरे, सहा. पोलीस निरीक्षक सचिन राऊळ, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहा. फौजदार सिताराम बोकड, युवराज बनसोडे, कुतुबुद्दीन खान, पोलीस हवा. शकील शेख, पो. हवा महेद्र सपकाळ, पोलीस नाईक शरद जाधवर, किशोर पवार, नितीन कदम, पोलीस शिपाई केतन तळपे, नागेश कमठणकर तसेच पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा फौजदार प्रकाश वाघमारे, पोलीस अंमलदार प्राण येवले यांनी समन्वयाने हा गुन्हा उघडकीस आणला.




