पिंपरी (प्रतिनिधी) – आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करा, असे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने आदेश प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2021 व 27 जानेवारी 2022 च्या आदेशानूसार प्रभाग रचना करावी, असे म्हटले आहे. याबाबत प्रभाग रचना तयार करण्याचे पत्र आल्याच्या वृत्ताला अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दुजोरा दिला.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महानगरपालिका निवडणूक विभागाने तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना तयार केली. प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केला. त्यानूसार महापालिकेचे 3 नगरसदस्यांचे 45 आणि 4 नगरसदस्यांचा 1 अशी प्रभाग रचना तयार झाली. तयार केलेल्या प्रभाग रचनेवर हरकती-सूचना देखील मागवून त्याची सुनावणी घेतली. निवडणुक विभागाने सुनावणीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सुध्दा पाठविला.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला. त्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले. राज्यात ओबीसी समाज सर्वाधिक असल्याने आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायची की नाही. हा पेच प्रसंग तयार झाला. त्यावर मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर विधानमंडळात कायदा करुन राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले प्रभाग रचनेचे अधिकार काढून सरकारकडे घेण्याची कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार आयोगाने केलेली प्रभाग रचना शासनाने रद्द केली.
दरम्यान, नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यानूसार की, महाराष्ट्र महापालिका अधिनियम 1949 अधिनियमानुसार सुधारित केलेल्या तरतूदीप्रमाणे मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करुन प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करावा. त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी. प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या 28 डिसेंबर 2021 व 27 जानेवारी 2022 च्या आदेशातील कार्यपद्धतीस अनुसरुन करण्यात यावी. असे म्हटले आहे.