मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. यानंतर सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी माध्यमांना महत्त्वाची माहिती दिली. किरीट सोमय्या यांनी कोर्टात चोरी मान्य केली आहे, असं मोठं विधान वकील घरत यांनी केलं. तसेच चोरी एक पैशांची असो की कोट्यावधींची, ती चोरीच असते. त्यामुळे सोमय्यांवर कारवाई होईल, असंही त्यांनी नमूद केलं. ते चित्र वाहिनीशी बोलत होते.
सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, “किरीट सोमय्या यांच्या प्रकरणात सकाळी युक्तीवाद झाला. सोमय्या यांनी त्यांच्या जामीन अर्जासोबत जी कागदपत्रे सादर केली होती तीच आम्ही विशेष करून दाखवली. कारण त्यांनी त्या कागदपत्रांमधून तो गुन्हा जवळजवळ कबुलच केला होता. तसेच फोटोग्राफ देखील लावले होते. त्यामुळे आमचा युक्तीवाद तोच झाला. मला नुकतंच सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळल्याचं समजलं. निकाल हातात आल्यावर त्यावर अधिक बोलेल.