पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू असून अधिका-यांच्या वाहनचालकाचा (ड्रायव्हर) पगार देखील एक लाख रुपयांपर्यंत गेला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना माहिती अधिकारात महापालिका अधिका-यांनी लेखी माहिती दिली आहे. वाहचालकाला 1 लाख पगार दिला जातो. वाहनचालक काय युद्ध लढायला जाताहेत काय, करदात्यांच्या पैशांतून वाहनचालकाला एवढा पगार कशाला दिला जातो. तो कमी करावा किंवा महापालिकेने भाडे तत्त्वावर मोटारी वापराव्यात, अशी मागणी नाईक यांनी केली.
महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी महापालिकेतील अधिका-यांच्या वाहनचालकांचा पगार, इंधनावरील खर्चाची माहिती मागविली होती. त्यांना केवळ नगररचना व विकास विभागाने माहिती दिली. महापालिकेच्या नगररचना विभागासाठी चार मोटारी आहेत. त्यासाठी तीन वाहनचालक आहेत. त्यातील रामदास गव्हाणे यांना 1 लाख 8 हजार 332, सुधाकर चक्कर यांना 83 हजार 220 आणि अहेमदशरीफ अत्तार यांना 65 हजार 932 रुपये मासिक वेतन आहे.
तर, या चार मोटीरांच्या इंधानापोटी मासिक 40 हजार रुपये खर्च होते. नगररचना विभागातील वाहनचालक आणि इंधनावर मासिक 2 लाख 97 हजार 484 रुपये खर्च होत असल्याची माहिती माहिती अधिकारातून पुढे आली. ही फक्त एका विभागाची माहिती आहे.


