मुंबई : राज्य सरकारने जमीन संपादित केल्यास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुण्याचा रिंगरोड बांधण्यास तयार आहे. खुद्द केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे हा ‘प्रस्ताव’ ठेवला आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आता कारवाई सुरू केली आहे. पुणे शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प शहराचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने भूसंपादनासाठी 1,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या रस्त्यासाठी 17 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज आहे. स्वत: गडकरींनी अजित पवारांना फोनवरून ऑफर दिली आहे.
राज्यभर रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी गडकरी कटिबद्ध आहेत. पुणे जिल्ह्यातील ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम जोरात सुरू आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. तसेच या रस्त्याची घोषणा करून त्याचा ‘डीपीआर’ तयार करण्याच्या सूचना दिल्या.
हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे….
पुणे रिंगरोडची संपूर्ण रचना तसेच डीपीआर तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पैसे मिळताच या रिंगरोडच्या भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने तातडीने जमीन संपादित केल्यास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करेल. यावरील खर्चाची जबाबदारी आम्ही घेणार असल्याचे गडकरी म्हणाले. जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची तयारी केली आहे. दोन टप्प्यात रिंगरोड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

