पुण्यातील वानवडी परिसरात विकास सराईत गुन्हेगाराचा 20 जणांच्या टोळक्याकडून भर चौकात निर्घृण खून करण्यात आला. कोयते, लाकडी दांडूके व दगडाने मारहाण करून अतिशय निर्घृणपणे हा खून करण्यात आला. वानवडीत भर चौकात मंगळवारी रात्री ९ वाजता हा प्रकार घडला आहे. आरोपी पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
सनी उर्फ गिरीष महेंद्र हिवाळे (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. तर, परवेज उर्फ सोहेल हैदरअली इनामदार (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी १९ ते २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सनी याची आई साधना हिवाळे (वय ५०) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सनी उर्फ गिरीष हा सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली होती. तो कारागृहात होता. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. दरम्यान पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून काही आरोपींनी मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास सनी व सोहेल आणि त्यांचे मित्र चौकात थांबले असता आरोपी तेथे आले. त्यांनी सनी व सोहेल याच्यावर कोयता, पालघन, लाकडी दांडके व दगडाने मारहाण करण्यास सुरूवात केली.
पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याने यामध्ये सनी याचा मृत्यू झाला. तर, सोहेल हा गंभीर जखमी झाला आहे. माहिती मिळताच वानवडी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, टोळके पसार झाले होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सावळाराम साळगांवकर हे करत आहेत.


