हिंजवडी (वार्ताहर) म्हातोबाच्या नावानं चांगभलं… अशा जयघोषाने आयटीनगरीचा आसमंत धुमधुमून निघाला. करोना महामारीमुळे मागील दोन वर्षे हिंजवडी, वाकड व पंचक्रोशीतील नागरिकांना बगाड यात्रा साजरी करता आली नव्हती. परंतु यंदा करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने हिंजवड, वाकड परिसरातील व महाराष्ट्रातून लाखो भाविक बगाड उत्सावाला दाखल झाले होते.
शनिवारी (दि. १६) सायंकाळी पाच वाजता साखरे पाटील घराण्यातील किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या निवडीची घोषणा केली. जांभूळकर घराण्यातील रामदास शिवाजी जांभूळकर या तरुणाला यंदाचा गळकरी होण्याचा मान मिळाला. तर दीपक दामू साखरे व संदेश गुलाब साखरे यांना खांदेकऱ्याचा बहुमान मिळाला. हुलावळे परिवारातील श्रीरंग हुलावळे यांना काठीचा मान मिळाला.
पैस… पैसचा जयघोष करत वाजत्र्यांच्या सनई चौघाड्याच्या निनादात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात आणण्यात आले. या वेळी त्यास स्नान घालण्यास जमलेल्या महिलांनी गर्दी केली. गळकऱ्याची विधिवत पूजा केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळयाला गावठाणातील म्हातोबा मंदिरात अभ्यंग स्नान घालून वाजत गाजत होळी पायथ्याजवळ आणण्यात आले. त्यानंतर संदीप साखरे व सुतार समाजातील पांडुरंग सुतार यांनी गळकऱ्याला गळ टोचला. या वेळी हातातील काठी उंचावून होणारा काठी नाद तसेच पैस… पैस.. व म्हतोबाच्या नावान चांगभलंचा जयघोषाने अवघी आयटीनगरी दुमदुमली होती. गळकरी व खांदेकऱ्यांचे पाय धुण्यासाठी व त्यांना पाणी पाजण्यासाठी पाण्याच्या घागरी घेऊन महिला गर्दीतून वाट काढत होत्या. बगाड रिंगण मैदानात गळकरी रामदासला आणल्यानंतर आयटीनगरी दुमदुमली आणि म्हातोबाच्या नावानं चांगभलं… नावाने परिसर दणाणून गेला.




