बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. ते जेवढे थेट बोलतात तेवढेच मिश्किल देखील आहेत. अनेकदा आपल्याला त्याचा परिचय येतो. बारामतीत असाच एक किस्सा घडला आहे. बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी ते म्हणाले की, ‘इथं तमाशा असतो का? मला पण बोलवत जा लहान असताना आजोबा म्हणायचे चल तमाशाला. पण तेव्हा जात नव्हतो’. अजित दादांच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकला. त्यानंतर सावरुन घेत त्यांनी म्हटलं की, तुम्ही बघितलं काय अन् मी बघितलं काय एकच. उरूस सुरू आहे, यात्रा सुरू आहेत, त्याचा आनंद घ्या. भाषणाच्या शेवटी आत भुका लागल्यात. जेवतो, भाषण बंद करतो असं म्हटल्यानंतरही कार्यकर्ते पोट धरुन हसले.
अजित पवार म्हणाले की, कामे चांगली दर्जाची करा. मी येणार म्हणून डांबरीकरण करण्याचा प्रयत्न केला. कामाच्या दर्जात आम्ही हयगय सहन करणार नाही. कामात हयगय झाली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार असं ते म्हणाले. वेगवेगळ्या सरकारमध्ये आंदोलन होतात त्या आंदोलनात नुकसान झालं तर त्या केसेस पाठीमागे घेतल्या जात नाहीत. परंतु संविधानाच्या मार्गाने ज्यांनी आंदोलन केली जातात त्या केसेस मात्र मागे घेतल्या जातात, असंही ते म्हणाले.