लोणावळा : सुमारे दिडशे वर्षाहून अधिक काळ देशभरात प्रसिद्ध असलेली लोणावळा चिक्की… या चिक्कीचे शहरात म्युरल असावे या भावनेतून लोणावळा नगरपरिषदेने शहराच्या प्रवेशद्वारासमोर उभारलेल्या चिक्की या शिल्पाचे अनावरण मावळचे आमदार सुनिल शेळके व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन सोमनाथ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरातील सर्व चिक्की व्यावसायिक व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
चिक्की मुळे लोणावळा शहराची ओळख सातासमुद्रांपलीकडे गेली आहे. लोणावळा शहरात फिरायला आलेले पर्यटक येथील प्रसिद्ध चिक्की घेण्याच्या मोह आवरू शकत नाही. अशी लोणावळा शहराची ओळख असलेल्या चिक्कीचे समुह शिल्प बनविण्याच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून मावळा पुतळा चौकात वेलकम लोणावळा या नावाच्या शेजारी सदरचे शिल्प उभारण्यात आले असून शहरात येणाऱ्या पर्यटकांचे ते नक्कीच आकर्षण ठरेल असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. सोबतच लोणावळा शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे.
पावसाळापूर्व कामांमध्ये हे काम हाती घेण्यात आले असून आजपासून आमदार शेळके यांच्या हस्ते नारळ वाढवत जलपर्णी काढण्याचे काम मशिनद्वारे सुरु करण्यात आले. सद्या कडक ऊन्हाळा असल्याने नदीपात्रातील ही जलपर्णी नदीबाहेर काढल्यास जळून जाऊ शकते याकरिता लवकर काम हाती घेण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी शहरातील नदी व नाले सफाईचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.




