बारामती : चार दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडहून बदली झालेले पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज शनिवारी (दि. २३) सकाळी बारामतीत गोविंदबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, भेटीनंतर कृष्ण प्रकाश ‘ये मेरी खासगी मुलाकात थी’ असे सांगत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
आयर्नमॅन अशी ओळख असलेल्या कृष्ण प्रकाश यांची बुधवारी (दि २०) मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा येथे बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई येथील सुधार सेवाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी तात्काळ पदभारही स्वीकारला आहे. बदलीच्या काळात कृष्ण प्रकाश हे रजेवर होते. रजा संपल्यानंतर त्यांनी माघारी येताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. त्यानंतर शरद पवार नियोजित कोल्हापूर दौऱ्यावर निघून गेले.





