अपहरण आणि खून केल्याप्रकरणी एका तरुणाला जेलमध्ये जावं लागलं होतं. २८ वर्षे त्याने जेलमध्ये शिक्षा भोगली. पण त्यानंतर मात्र त्याच्या वयाच्या ५६ व्या वर्षी समोर आलं की खऱंतर तो निरपराध होता. हे कळल्यावर मात्र तो आपले अश्रू रोखूच शकला नाही.
ही कथा आहे ५६ वर्षीय बिरबल भगत याची. सगळं तारुण्य जेलमध्ये वाया घालवल्यानंतर अखेर वयाच्या ५६ व्या वर्षी तो निर्दोष असल्याचं न्यायालयाने जाहीर केलं आणि त्याची जेलमध्ये मुक्तता केली. न्यायालयाने पोलिसांच्या चुकीबद्दलही भाष्य केलं आहे. सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयासमोर आपली बाजूही मांडली नाही आणि या प्रकरणातले साक्षीदार असलेल्या डॉक्टरलाही न्यायालयासमोर सादर केलं नाही. एवढंच नव्हे तर अजूनपर्यंत त्यांनी आरोपपत्रही न्यायालयात सादर केलं नव्हतं.
हे प्रकरण आहे १९९३ सालचं. उत्तर प्रदेशातल्या देवरियामधल्या बिरबल भगतला सूर्यनारायण भगतचं अपहरण आणि हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. सुरुवातीला सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू होती. अनेक वर्षे सुनावणी सुरूच राहिली. अखेर अप्पर जिल्हा सत्र न्यायालयात जेव्हा हे प्रकरण पोहोचलं तेव्हा ते न्यायालयाने गांभीर्याने घेतलं आणि सुनावणी पुढे जाऊ लागली. कोर्टासमोर पोलीस साक्ष सादर करू शकले नाहीत आणि त्यामुळे अखेर या आरोपीला निर्दोष मुक्त करण्यात आलं.
ज्यावेळी पोलिसांनी बिरबलला अटक केली तेव्हा त्याचं वय होतं २८ वर्षे. आज तो ५६ वर्षांचा आहे. २८ वर्षे जेलमध्ये शिक्षा भोगल्यानंतर आज तो बाहेर पडतोय. त्याच्या घरच्यांनीही त्यालाच गुन्हेगार ठरवून त्याच्याकडे लक्ष देणं सोडून दिलं. ना त्याला कोणी भेटायला आलं आणि ना कोणी त्याच्या जामिनासाठी काही प्रयत्न केले.




