कोल्हापूर : चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे वादग्रस्त बनलेले ॲड. गुणरत्न सदावर्ते याला गुरुवारी कोल्हापूरपोलिसांनी अटक केली. ‘गुणरत्न सदावर्तेला कोल्हापुरी हिसका दाखवू’, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांची पळापळ झाली. त्याला न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सचिन तोडकर, दिलीप पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना नोटिसा बजावून ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आले.
मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ॲड. सदावर्ते याने एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत चिथावणीखोर वक्तव्य केले. त्याबाबत त्याला गुरुवारी अटक केली. त्याच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे न्यायालयात हजर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सचिन तोडकर व मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांना नोटीस बजावली होती.तसेच गुरुवारी सकाळीच तोडकर याला त्याच्या निवासस्थानातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच दिलीप पाटील हे फिर्यादी असल्यामुळे त्याला ताब्यात घेताना पोलिसांना अडचणी आल्या. पण, इतर कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले होते.



