महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पुण्यातील सर्व मंदिरात तीन तारखेला महाआरती करण्यात येणार असून त्यामध्ये मनसैनिकांसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्यासह संलग्न असलेल्या सात ते आठ संघटना सहभागी होणार आहे. यासंदर्भातील माहिती मनसेचे नेते अजय शिंदे यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये एक मे रोजी जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच तीन तारखेला रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू असून आज शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.