पिंपरी :- आकुर्डी येथील थरमॅक्स चौकात सोमवारी अतिक्रमणविरोधी पथकाने शेकडो पोलीस अधिकारी व मार्शल पथकाच्या साह्याने मोठी कारवाई केली एका माजी नगरसेविकाच्या भावाने चौकात जवळपास सहा ते सात गुंठे जागेवर अतिक्रमण केले होते. ते सर्व जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेने त्याठकाणी डांबरी रस्ता बनवला.
गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी एक समाजाचे कार्यालय थाटून, दुकाने, टपरीधारक, हातगाडी व खासगी कार्यालयात व्यावसाय करीत होते. या चौकातून चाकण, भोसरी, तळवडे, हिंजवडी आयटी पार्क या ठिकाणी जाणाऱ्या कामगार वर्गाची ये – जा मोठ्या प्रमाणात असते. यामुळे या चौकात बस, मालवाहतूक करणारे ट्रेलर्स आदी वाहनांची तसेच पायी चालणाऱ्यांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी अनेकांनी विविध प्रकारची दुकाने टपरीतून, हातगाडीतून दुतर्फा थाटली आहे. परिणामी रस्त्याच्या हा मार्ग वाहनचालकांसाठी व पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला होता.
येथील मार्गावरील अतिक्रमण काढून टाकण्यासाठी महापालिकेच्या अ व फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई करण्यात आली. सोमवारी दुपारी अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच निगडी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली.




