महाराष्ट्र माझा
देशाचा विकास, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांना तोंड द्यावयाचे असेल तर द्वेषाच्या राजकारणातून बाहेर पडत सामाजिक एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले आहे. सामाजिक एकात्मतेचा सोहळा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केला होता. त्यावेळी पवार बोलत होते.
भोसरी येथे शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय एकात्मता स्नेह मेळावा जश्ने ईद-ए-मिलन हा कार्यक्रम पार पडला. सर्वधर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन केले होते. सर्वधर्मीय लोक या मेळाव्यात सहभागी झाले होते.
आपलं पिंपरी चिंचवड हे ‘मिनी भारत’ आहे. इथे देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध जाती-धर्माचे लोक रोजी-रोटीसाठी येतात आणि गुण्यागोविंदाने राहतात. इथे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करून अशांतता आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या फासीवादी शक्तींना दूर लोटले पाहिजे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांचा समतेचा, सामाजिक एकतेचा वारसा अविरतपणे पुढे चालवत राहण्याचा ध्यास आपण सर्वांनी घेतला पाहिजे. असे पवार यांनी म्हटले आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व धर्मांचे धर्मगुरु व मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.




