पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाने आज निवडणूक आयोगाच्या शिफारशीनंतर मोठी घोषणा केली आहे. यामध्ये मुंबईसह कोकण भागातील महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतर होतील. मात्र विदर्भ व मराठवाडा विभागातील महापालिका निवडणुका तातडीने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आदेश मुख्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर आज मंगळवारी (दि. १७) रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला, ज्या भागात पाऊस नाही तिथे निवडणुका घ्यायला काय हरकत आहे? मराठवाडा आणि विदर्भाबाबत बोलत असताना न्यायालयाने आयोगाला हा प्रश्न विचारला.
राज्यात जिथे पाऊस पडतो त्या भागांत पावसाळ्यानंतर निवडणुका घ्या, पण जिथे पाऊस कमी पडतो तिथे मात्र निवडणुका लांबवण्याची गरज नाही. जिल्हानिहाय, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार पावसाळ्याची स्थिती लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर करावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यातील महापालिका निवडणुका बाबत राज्य शासन व निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याची उत्सुकता वाढली आहे.
प्रलंबित महापालिका, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, नगर पंचायतींच्या निवडणुका पावसाळ्यात घेता येणार नाहीत. सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमध्ये या निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात असा मागणी करणारा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. या अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली, त्यावेळी कोर्टाने भाष्य केले.