पिंपरी, दि. 3 (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सत्ता काळात शहरात विकास कामांची गंगा आणली. मात्र, गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत विकास कामांना मोठ्या प्रमाणात खीळ बसली होती. भाजपच्या सत्तकाळात शहरात निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉक भरून काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुन्हा शहरात जातीने लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे. आज शुक्रवार (दि. 3) रोजी एकाच दिवशी महापालिकेने विकसित केलेल्या आणि विकसित करण्यात येणाऱ्या पावणेदोनशे कोटी रूपयांच्या 10 विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि विकास हे समिकरण तब्बल पाच वर्षानंतर शहरात पहावयास मिळाले.
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे सत्ता होती. शहराचा सर्वांगीन विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रासह राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीच्या माध्यमातून शहरात उच्च दर्जाच्या मुलभूत सुविधा, प्रशस्त रस्ते, अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली उद्याने, खेळासाठी मैदाने, दुमजली उड्डाणपुल, झोपडपट्टीतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मोठे प्रयत्न केले. शहराला मोठा नावलौकीक मिळवून देतानाच देशातील सर्वाधिक वेगाने विकासीत होणे शहर बनविले.

मात्र, 2017 च्या निवडणुकीत मतदार अपप्रचाराला बळी पडल्याने महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जावून भाजपची सत्ता आली. स्वच्छ कारभाराचा नारा देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी भ्रष्टाचार करून आपली घरे भरण्याचा एककलमी कार्यक्रम राबविला. त्यामुळे शहरातील विकास कामांना गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात “खो” बसला आणि शहर विकासाचा वेग मंदावला. शहर विकासाचा मंदावलेला वेग पुन्हा वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी चंग बांधला आहे. विकास कामात कोणतेही राजकारण झाले नाही पाहिजे, अशी भूमिका उपमुख्यमंत्री पवार सातत्याने घेत असतात. याच अनुंषगाने महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांना प्रशासकीय राजवटीत विकास कामे थांबायला नकोत, अशा सूचना देऊन विकास कामांचा वेग वाढविण्याचा आदेश दिला आहे.

त्यानुसार, शुक्रवारी सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शहरातील तब्बल पावणेदोनशे कोटी रूपयांच्या विकास कामांची उद्घाटने आणि भूमिपूजने करण्यात आली आहे. यामध्ये महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत उद्योग सुविधा कक्षाचे उद्घाटन, पेट्रोलिंगसाठी 50 स्मार्ट मोटार सायकलचे पोलिसांना वाटप, अग्निशमन सेवा देण्यासाठी फायटर मोटार सायकलचे वाटप, कासारवाडी येथील सी.एम.ई. चे आर्मी रोईंग नोड, रोईंग प्रशिक्षणाचे उद्घाटन, नेहरूनगर येथे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयममधील हॉकी ऍकॅडमीचे उद्घाटन, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी, तळवडे गायरानातील उद्यानाचे लोकार्पण, त्रिवेणीनगर चौकापर्यंत इको ट्रॅकचे भूमिपूजन, थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर ऍकॅडमीच्या पॅव्हेलिअनचे उद्घाटन, वाकड येथील कै. तानाजीभाऊ तुकाराम कलाटे उद्यानाचे लोकार्पण, पिंपळे सौदागर येथील अखिल भारतीय कबड्डी पंच स्व. बाळासाहेब बाजीराव कुंजीर क्रीडांगणाचे लोकार्पण करण्यात आले. याचबरोबर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या 7 हजार 600 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. या सर्व प्रकल्पासाठी सुमारे 178 कोटी 57 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.




