भोसरी : भोसरी आळंदी रस्त्यावरील पार्किंगचा प्रश्न सुटावा आणि पुण्यातील लक्ष्मी रोडवरील बाजारपेठेच्या धर्तीवर भोसरी-आळंदी रस्त्यावरील बाजारपेठेचा विकास व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्या प्रयत्नातून बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या वाहनतळाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
भोसरी येथील क्रमांक पाच, गवळीनगरमधील नागरिकांना अत्याधुनिक सुविधांसाठी अजित गव्हाणे सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच प्रभाग क्रमांक पाचचा झपाट्याने विकास झाला आहे. आतापर्यंत या प्रभागामध्ये सखुबाई गबाजी गवळी उद्यान, स्केटींग ग्राऊंड, ए.पी. फिटनेस जीम, शंकर गवळी बॅडमिंटन हॉल, धोंडिबा फुगे क्रीडा संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खेळाचे मैदान, राधानगरी उद्यान, गंगोत्री पार्क उद्यान यासारखी अनेक महत्वपूर्ण विकासकामे झाली आहेत. आता प्रभागामध्ये बहुमजली वाहनतळ उभारले जात आहे. हे तीन मजली वाहनतळ आहे. यामध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार असून दीडशे दुचाकी आणि 75 चारचाकी वाहनांना पार्किंगची सुविधा असणार आहे. महिला व पुरुषांसाठी प्रत्येकी तीन स्वच्छतागृह उभारण्यात येणार असून लिफ्टची सुविधाही देण्यात येणार आहे. शहरातील हे पहिले अत्याधुनिक वाहनतळ ठरणार आहे.




