वडगाव मावळ : तळेगाव नगरपरिषदेच्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते झाल्यानंतर मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या जागेवर गोमूत्र शिंपडून उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका करण्यात आली होती. सदर प्रकरणात मावळ शिवसेनेची भूमिका काय आहे, हे पत्रकारांनी विचारल्यावर विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा पहाटे शपथविधी हा गोमूत्र शिंपडून केला होता का? असा खोचक प्रश्न उपस्थित करून मावळ भाजपच्या दुटप्पी धोरणावरती टिकास्त्र सोडले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची वार्ड रचना नुकतीच जाहीर करण्यात आली पण या वार्ड रचनेवर शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजित करण्यात आलेल्या वार्डरचनेवर मावळ शिवसेना आपली भूमिका मांडण्यासाठी कामशेत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना तालुका शिवसेना प्रमुख राजू खांडभोर यांनी तालुक्यातील सत्ताधारी पक्षावर आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला सोयीस्कर अशी वार्ड रचना केल्याचे सांगितले.
कुसगाव-वरसोली हा गट शिवसेनेला अनुकूल असल्याने त्यात बदल केला असून त्यात अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावरील सोमाटने गाव समाविष्ट केल्याने भविष्यात निवडून येणाऱ्या उमेदवाराला काम करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन झालेल्या वार्ड रचनेत योग्य तो बदल केला पाहिजे अशी शिवसेनेच्या वतीने मागणी केली. याशिवाय नवीनच उल्लेख झालेल्या तळेगाव दाभाडे ग्रामीण गटाबाबतही संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शरद हुलावळे, उपतालुका प्रमुख सुरेश गायकवाड, डॉ.विकेश मुथा, आशिष ठोंबरे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन शेडगे व आभारप्रदर्शन डॉ.विकेश मुथा यांनी मानले.




