पिंपरी-चिंचवड चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. याचा प्रत्यय मंगळवारी (दि. 7) पुन्हा एकदा आला. मंगळवारी शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या तब्बल 18 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये 11 लाख 57 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
चिखली, देहूरोड, हिंजवडी, चाकण पोलीस परिसरात घरफोडीचे चार गुन्हे दाखल आहेत. चिखली येथील घटनेत वडाचा मळा येथील दोन दुकानातून 21 हजार 500 रुपये रोख रक्कम चोरून नेली. देहूरोड येथील घटनेत देहूगावातील बोत्रे कॉम्प्लेक्स मधील कपड्यांच्या तीन दुकानातून 29 हजार 950 रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे. हिंजवडी येथील घटनेत एका घरातून सात लाख पाच हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. चाकण येथील घटनेत 74 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.
मोरेवस्ती चिखली मधून एक मोबाईल फोन आणि लॅपटॉप चोरट्याने उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरून नेला. निगडी, चिंचवड, आळंदी, हिंजवडी मधून 11 मोबाईल चोरीला गेले आहेत. ट्रान्सपोर्ट नगर निगडी येथे एका गाडीत चालकाने पॅन्टच्या खिशात पैशांचे पाकीट ठेऊन पॅन्ट ड्रायव्हर सीटच्या मागे ठेवली. अज्ञात चोरट्याने त्या पॅन्टच्या खिशातून पाच हजार रुपये चोरून नेले आहेत. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिघी, एमआयडीसी भोसरी, भोसरी, हिंजवडी मधून प्रत्येकी एक, चाकण मधून तीन अशी सात दुचाकी वाहने चोरीला गेली आहे. तर पिंपळे सौदागर मधून अज्ञात चोरट्यांनी कारचा 10 हजारांचा सायलेन्सर चोरून नेला आहे. वरील 18 घटनांमध्ये चोरटे लाखो रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.




