शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला असे म्हणत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांबाबत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे.
“माझे नाव विधान परिषदेसाठी नाव जाहीर केले यासाठी मी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने जाहीर केल्याबद्द्ल मी त्यांचे अभिनंदन करतो. गेली ४० वर्षे भाजपामध्ये निष्ठेने काम करत होतो. पण अनेक वेळा त्याठिकाणी अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. भाजपात असताना विधान परिषदेसाठी नाव देण्याचे आश्वासन दिले होते. अनेक प्रसंग असे घडत गेले की त्यामुळे मला नाईलाजाने भाजपाचा त्याग करुन राष्ट्रवादीमध्ये यावं लागलं. शरद पवार यांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास टाकला. तो विश्वास मी सार्थ करेन. आमच्या भागामध्ये भाजपा वाढण्यासाठी उभे आयुष्य काढले आता राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी काम करेन,” असे एकनाथ खडसे म्हणाले



