अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी उमेदवार असेल तर त्यांना आमचं समर्थन असल्याचं वक्तव्य केलं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिलीय. अमोल मिटकरी यांनी या वक्तव्याचं स्वागत करत पटोलेंचे धन्यवाद मानले आहेत. तसेच सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांची भेट घेण्यास पाठवल्याचंही नमूद केलं. अमोल मिटकरी सोमवारी (१३ जून) अकोल्यात आरएनओ या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
अमोल मिटकरी म्हणाले, “५५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले पद्मविभूषण खासदार शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात भाजपाविरोधात मोठी मोट बांधणं सध्या सुरू आहे. सोनिया गांधी यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना शरद पवार यांची भेट घेण्यास सांगितलं होतं. त्याआधारेच देशातील सर्व मोठ्या पक्षांचा शरद पवार यांना पाठिंबा आहे.



