पिंपरी : आज देहू नगरीमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात भाजप पदाधिकार्यांनी राजकीय रंग दिला. मावळचे माजी आमदार बाळा भेगडे व देहू संस्थांचे पदाधिकारी यानी स्थानिक आमदार खासदार यांना निमंत्रण न दिल्याने नाहक नाराजी आषाढी वारीच्या तोंडावर देहू संस्थानला परवडणारी नसल्याचेही बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होणे अपेक्षित असतानाही त्यांना भाषण करून न दिल्याने भाजपकडून हा धार्मिक कार्यक्रम हायजॅक केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपच्या माजी आमदारापासून पिंपरी चिंचवडमधील आमदार पदाधिकारी, प्रवक्ते व राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा या कार्यक्रमामध्ये मोठा वावर होता. हा देहू संस्थानचा कार्यक्रम की भाजपचा प्रचार मेळावा हा प्रश्न उपस्थित वारकऱ्यांना पडला होता. पंतप्रधान हे देशाचे असतात याचाही विसर पडलेल्या भाजप नेत्यांची मनमानी वारकरी सांप्रदायाची मने दुखावणारी ठरल्याची चर्चा रंगली आहे.
यावर खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, देहू संस्थानने धार्मिक कार्यक्रमात राजकारण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मावळ लोकसभा मतदारसंघात धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असतील, तर स्थानिक खासदार म्हणून देहू संस्थानने मला निमंत्रण देणे आवश्यक होते. मात्र, देहू संस्थानने धार्मिक कार्यक्रमात राजकारण करत, मला साधे निमंत्रणदेखील दिले नाही. संस्थान पदाधिकाऱ्यांची ही कृती योग्य नाही अशा शब्दांत बारणे यांनी नाराजी व्यक्त केली.
मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले की. देहू संस्थानचा कार्यक्रम हा मावळ विधानसभा मतदारसंघात झाला. मी या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्त्व करत आहे. तरीदेखील देहू संस्थानकडून या कार्यक्रमाचे आपल्याला निमंत्रणच दिले नव्हते. अशा कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना डावलणे योग्य नाही असे शेळके यांनी सांगितले.




