पुणे दि.15 जून ; पुणे शहर मुख्याध्यापक संघाची नवीन पदाधिकारी कार्यकारिणी निवडीबाबतची सभा नुकतीच पुण्यात संपन्न झाली. यावेळी पुणे शहर मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सुंदराबाई राठी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुजित जगताप तसेच सचिवपदी रामराज्य माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी कामथे व शिवाजी विद्या मंदिर आंबेगावचे मुख्याध्यापक शिवाजी शिंदे यांची कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
मुख्याध्यापक संघ हा शासन, जिल्हा परिषद व शाळा यांच्यामधील महत्त्वाचा दुवा असून शालेय वार्षिक नियोजन, परीक्षा नियोजन, प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, तसेच शासकीय स्तरावरील वेगवेगळे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या निवडीचे पत्र पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक, मा. हरिश्चंद्र गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुनंदा वाखारे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर सर, शांताराम पोखरकर, चंद्रकांत मोहोळ, सौ अनिता साळुंखे, तसेच मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




