औरंगाबाद : ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे (AIMIM) प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपाकडून महाविकास आघाडीला एकनाथ खडसे यांना उमदेवारी न देण्याचा आणि त्या बदल्यात बिनविरोध विधान परिषद निवडणुकीचा प्रस्ताव दिल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय. इम्तियाज जलील यांनी म्हटल्याप्रमाणे आमच्याकडून भाजपाकडून मविआला असा कोणताही प्रस्ताव देण्यात आला नाही, असं मत रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीबाबत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, “एकनाथ खडसे यांना विधान परिषद उमेदवारी न दिल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडून त्यांना देण्यात आला नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि मी बुधवारी (१५ जून) सोबत होतो.
आमची या विषयावर चर्चा झाली. खडसेंना उमेदवारी देऊ नका असा कोणताही प्रस्ताव आम्ही दिला नाही. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे. आम्ही का कुणाचं नाव सुचवावं असंही रावसाहेब दानवेंनी नमूद केलं.



