देहूगाव ,दि.१६ (वार्ताहर) संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील भाविक,वारकऱ्यांसाठी तिर्थक्षेत्र देहूत असंख्य देणगीदारांच्या दानातुन,लोकवर्गणीतुन संत तुकाराम अन्नदान मंडळ गेली २८ वर्ष अन्नदानाचा उपक्रम राबवित आहे.यंदा २८ वे वर्ष असुन १८ ते २० जुन रोजी देहूगाव येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये आणि आषाढी वद्य एकादशी २४ जुलै रॊजी ( पालखी पुनरागमन दिनी ) चिंचोली येथील शनि मंदीरात महाप्रसादाचे ( अन्नदान ) वाटप करण्यात येणार आहे.
जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळयासाठी येणाऱ्या भाविक – वारकऱ्यांच्या सेवेसाठी देहूतील काही सामाजिक कार्यकर्त्याच्या संकल्पनेतुन अन्नदानाची सुरुवात ३० जून १९९४ रोजी प्रारंभ करण्यात आला.सुरूवातीला छोट्या स्वरुपात सुरु केलेले अन्नदानाने भव्य स्वरूप प्राप्त केले आहे.असंख्य देणगीदारांच्या रोख रक्कम, धान्य, भाजीपाला, मसाला स्वरुपात मिळणाऱ्या दानातुन तसेच पंचक्रोशीतील महीला,ग्रामस्थाकडून चपाती,भाकरीच्या करण्यात येणाऱ्या दानातुन वारकऱ्यानां महाप्रसादाचे वाटप केले जाते.
मंडळ पहील्या दिवशी ( दि.१८ ) सायंकाळी आमटी भात,दुसऱ्या दिवशी ( दि.१९ ) पिठले भात,पालखी प्रस्थान दिनी (दि.२० ) संपूर्ण दिवस बुंदी,मसाले भात,भाजी ( शॅक भाजी ) भाकर अशा स्वरूपात अन्नदान देहूतील श्री शिवाजी चौकातील हनुमान समाज मंदीरात केले जाते आणि पालखी पुनरागमन दिनी ( दि.२४ ) चिंचोली येथील शनि मंदीरात एकादशी निमित्त साबूदाना खिचडीचे वाटप करीत असते.या उपक्रमाला गावातील आचारी,महीलासह तरूण वर्ग योगदान ,श्रमदान करीत सेवाभावी काम करीत असतात.
अन्नदान मंडळाचे संकल्प पालखी सोहळा प्रस्थान पर्यत प्रतिवर्ष ३ दिवस अन्नदान पालखी सोहळा पुनरागमन दिनी : साबुदाणा खिचडी वाटप
देहूत प्रतिदिन दाखल होणाऱ्या भाविक वारकऱ्यांना अन्नदान करण्यासाठी कायमस्वरूपी अन्नदान छत्र उभारण्याचा संकल्प आहे .त्यासाठी संत तुकाराम अन्नदान मंडळाला तीर्थक्षेत्र देहूत अन्नदान करण्यासाठी शासनाने अन्नछत्रालय उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.




