मुंबई : राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपा आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. विधानपरिषदेची जबाबदारी अशिष शेलार आणि गिरीश महाजन यांच्यावर सोपवून फडणवीस स्वत: जोरदार तयारीला लागले आहेत. सोबतीचा चंद्रकात पाटीलही आहेत. संख्याबळ कमी असतानाही विधानपरिषदेवर पाचवा उमेदवार पाठवायचा आणि महाविकास आघाडी सरकारची कोंडी करायची, हा भाजपचा डाव आहे.
याआधी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांना निवडून आणून भाजपने तिन्ही पक्षांना शह दिला आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या बहुजन विकास आघाडीच्या मतांचा कौल यंदा कोणाला मिळणार, याकडे सर्वांच लक्ष्य लागलं आहे. त्यांच्याकडे हक्काची तीन मतं असल्याने राज्यसभेसाठी देखील त्यांची मनधरणी करण्यात आली होती. आता मतदानाला चार दिवस बाकी असताना बहुजन आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे नालासोपारा आमदार क्षितीज ठाकूर अचानक न्यूयॉर्कला निघून गेले.
बविआ कडे स्वत:ची तीन मतं आहेत. ही मतं ज्या पक्षाला मिळतील, त्यांचा विजय सुकर मानला जातोय. पण आता त्यांच्या तीनपैकी एका मताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. कारण आघाडीतील नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर अचानक कौटुंबिक कामासाठी न्युयॉर्कला गेले आहेत. विधान परिषदेची निवडणूक 20 तारखेला आहे. त्यामुळे तोपर्यंत ते परत येणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. क्षितीज ठाकूर देशाबाहेर गेल्याने एका मताचा प्रश्नचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी शेवटपर्यंत सगळे पत्ते झाकून ठेवले होते. त्यांनी माध्यमांशीही चर्ची केली नाही. हाच सस्पेन्स यंदा कायम ठेवण्यासाठी ही ठाकूर यांची खेळी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नुकतेच काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनीही ठाकूर कुटुंबीयांची भेट घेतली होती. याआधी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सर्व पक्षांना अपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागणार होता. त्यामुळे अपक्षांच्या मतांवर दिल्लीचा रस्ता सुकर होणार, हे स्पष्ट होतं. यासाठी शिवसेनेतर्फे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनिल राऊत यांच्या शिष्टमंडळाने बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत चार तास चर्चा केली. बंद दाराआड चर्चा झाल्याने सगळ्यांनाच उत्सुकता होती. मात्र कौटुंबीक बाबींवर अधिक चर्चा झाल्याचं नेत्यांनी सांगितलं. मात्र, ही बैठक संपताच भाजपचे संकटमोचन गिरीश महाजन यांनी ठाकूर यांची भेट घेतली. आणि त्यांच्याकडून शब्द घेऊनच ते बाहेर पडले. याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला झाला होता.



