पिंपरी : सध्या राजकारणात राज्यसभा विधान परिषद या निवडणुकांच्या बरोबर पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चाची चर्चा सर्वाधिक होत आहे. भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद व जालना येथे पाणीप्रश्नावर जलआक्रोश मोर्चा काढून सरकारवर ताशेरे ओढले. त्याच पद्धतीने कर्तव्यदक्ष फडणवीस भाजपची सत्ता असणाऱ्या पुणे, पिंपरी-चिंचवड व सोलापूर शहरात पाणीटंचाई विरोधात जलआक्रोश मोर्चा काढणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात जलआक्रोश मोर्चा काढून पाण्याचे राजकारण करत असताना केंद्रीय रस्ते मंत्री व भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी नागपुरातील बैठकीत शहराच्या पाणीप्रश्नावर नाराजी व्यक्त करत फडणवीस यांना घरचा आहेर दिला आहे. तीच परिस्थिती भाजपची सत्ता असलेल्या इतर महापालिका कार्यक्षेत्रात आहे. पण आपल्याला कोणी प्रश्नच विचारणार नाही अशी भावना भाजपच्या नेत्यांमध्ये प्रबळ झाल्याने ते पाणीप्रश्नावर दुटप्पी राजकारण सुरू केले आहे.
मागील पाच वर्षांत भाजपची सत्ता येऊनही सोलापूरकरांच्या आयुष्यातील पाणीप्रश्न काही मिटलेला नाही. सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख असे एकाच सोलापूर शहरात दोन मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते. गेली पाच वर्षे भाजपचीच सत्ता महापालिकेत होती. गेल्या २० वर्षांपासून शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. उलट वरचेवर पाणी प्रश्न जटील होऊन पाच ते सहा दिवसाआड तोही अपुरा पाणी पुरवठा होतो. याच प्रश्नावर २०१७ सालच्या सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने रान उठवून सत्ता मिळविली होती. हीच परिस्थिती पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आहे. या दोन्ही शहरात सत्तेत असणाऱ्या भाजपच्या काळात कमी दाबाने व दिवसाआड पाणीपुरवठा आजही सुरू आहे. मात्र, याबाबत कोणताही ब्र शब्द स्थानिक भाजप नेते व त्यांचे राज्यातील नेते काढत नाहीत. त्यामुळे भाजपकडून पाणीप्रश्नावर होणारे सोयीस्कर राजकारण आता सामान्य जनतेला समजत आहे.




