मुंबई : मागील आठवड्यात झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करण्यासाठी कोर्टाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. आता आगामी विधानपरिषद निवडणुकीतही दोघांना मतदान करता येणार नाही. मुंबई हायकोर्टानं या दोघांनाही मतदान करण्यास नकार दिला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोघेही विविध प्रकरणात सध्या तुरुंगात आहेत.
या दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करण्याची परवानगी देण्याचीही विनंती मुंबई हायकोर्टाकडे केली होती. मात्र, तिथंही त्यांना मतदान करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता विधानपरिषदेतही मतदान करता येणार नाही. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून माजी राज्यमंत्री सचिन अहिर आणि नंदूरबारचे स्थानिक शिवसेना नेते आमशा पाडवी यांना तिकीट दिलं आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोडून राष्ट्रवादीत दाखल झालेले वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे या दोन वरिष्ठ नेत्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने विधानपरिषदेत पाच उमेदवारांना संधी दिली आहे. प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिले आहे.
विधानपरिषद निवडणुकीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यसभेच्या वेळी आमच्याकडून काही चुका झाल्या. त्या सुधारून आम्ही विधानपरिषद निवडणुकीला सामोरं जाऊ. आम्हाला विश्वास आहे की आम्ही सर्व जागा जिंकू.
दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, “महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानाआधीच अपशकुनास सामोरं जावं लागलंय. भाजपच्या विजयाचं वारं वाहू लागलं आहे. विजयाचे हे शुभसंकेतच आहेत


