लोणावळा : शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालामध्ये लोणावळा विभागातून एकूण दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. विशेष म्हणजे यात लोणावळा नगरपरिषदेद्वारे संचालित करण्यात येणाऱ्या तिन्हीही शाळांचा निकाल शत प्रतिशत लागला आहे. तर उर्वरित सर्व शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे.
मावळ तालुक्यातून यावर्षी माध्यमिक शाळांत परीक्षेला एकूण ८२ शाळांमधून ५३९० विद्यार्थी बसले होते. यातील एकूण ५२६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण सरासरी ९७.६४% इतकी राहिली. लोणावळा शहर आणि परिसरातील एकूण २० शाळांमधून १५७० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी एकूण १५०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची एकूण सरासरी ९६.०५ टक्के राहिली.
लोणावळा केंद्र आणि परिसरातील लोणावळा नगरपरिषद माध्यमिक हायस्कूल – लोणावळा, लोणावळा नगरपरिषद माध्यमिक हायस्कूल – खंडाळा, लोणावळा नगरपरिषद उर्दू माध्यमिक विद्यालय, गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल, डॉन बॉस्को हायस्कूल, तुंग माध्यमिक विद्यालय – तुंग, शान्तीसदन, सोजर विद्यालय – कुरवंडे, आंतरभारती बालग्राम विद्यालय आणि नागनाथ विद्यामंदिर – औंधे या दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय अॅड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल (९८.२४ टक्के), ऑक्झीलीयम कॉन्व्हेंट (९९.४८ टक्के), डी.सी. हायस्कूल (९७.१० टक्के), श्री एकविरा विद्यामंदिर – कार्ला (९५.९४ टक्के), ऑल सेंट चर्च (९५ टक्के), गुरुकुल मराठी माध्यम (९८.६८ टक्के), व्ही.पी.एस. हायस्कूल (९०.०८ टक्के), डॉ. बी. एन.पुरंदरे विद्यालय (९१.९६ टक्के), शांतिदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय, मळवली (९७.९५ टक्के) आणि वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय, देवघर (९६.३० टक्के) या शाळांच्या विद्यार्थ्यांनीही उज्वल असे यश संपादन केले आहे.