मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यांची समजूत घालण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे जनक संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे सरकार बरखास्त होण्याची शक्यता बळावली आहे.
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने..
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 22, 2022
त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



