मुंबई : सक्तवसुली संचालनालय (ईडी), सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव हे आमदार व खासदार भावना गवळी यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले आहे. भाजपच्या जवळ गेल्यास निदान केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा तरी सुटेल, असा या लोकप्रतिनिधींना विश्वास वाटत असावा.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामध्ये राज्याच्या विविध विभागातील शिवसेनेचे आमदार आपापल्या भागातील राजकीय समीकरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला विरोध करत सामील झाले. त्याचवेळी ईडी-आयकर विभागासारख्या केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आमदारही एकनाथ शिंदे यांना साथ देत आहेत. भाजपमध्ये गेल्याने ईडीवगैरेच्या चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते, असे विधान माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. त्याचबरोबर किरीट सोमय्या यांनी आधी ज्या नारायण राणे व कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप केले त्या राणे व सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर सर्व चौकशा बंद झाल्या होत्या.
या इतिहासामुळे आपल्यावरील केंद्रीय यंत्रणांची कारवाई टाळण्यासाठी काही आमदार-खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे. बांधकाम प्रकल्पांमधील गुंतवणूक आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील कामांवरून ईडीने प्रताप सरनाईक यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. बरेच दिवस त्यावरून सरनाईक अडचणीत होते. त्या काळात प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेने भाजपसोबत पुन्हा जावे म्हणजे ईडीसारख्या यंत्रणांचा त्रास होणार नाही, असे आवाहन केले होते. त्या पत्रावरून बराच गदारोळ झाला होता. ठाण्यातील राजकारणात प्रताप सरनाईक व एकनाथ शिंदे यांच्यात स्पर्धा होती.
पण आता तेच प्रताप सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील स्थायी समितीचे माजी सभापती व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले. यशवंत जाधव यांनी गेल्या काही वर्षांत घेतलेल्या मालमत्ता व इतर संपत्तीवरून बेहिशेबी संपत्ती गोळा केल्यावरून चौकशीचा फेरा सुरू झाला. ईडीची नजरही त्यांच्याकडे गेली आहे. ‘मातोश्री’चे निकटवर्तीय असलेल्या जाधव यांच्या आमदार पत्नी यामिनी यांनी शिंदे यांना साथ दिल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
परंतु केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यातून सुटका व्हावी या उद्देशानेच आमदार जाधव या शिंदे यांच्या गोटात गेल्याचे बोलले जाते. शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर विचार करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. शिवाय शिवसेनेच्या या मावळय़ांवर कोणतीही कार्यवाही करू नये, असे आर्जवही केले आहे. रिसोड (जि.वाशिम) येथील बालाजी पार्टिकल्स या कारखाना विक्री व अन्य आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात खासदार गवळी व त्यांच्या निकटवर्तीयांना सक्तवसुली संचालनालयाने गेल्या वर्षभरापासून चौकशीच्या फेऱ्यात घेरले आहे. खासदार गवळी ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या असताना पक्षस्तरावरून काहीही सहकार्य झाले नाही, अशी त्यांच्या समर्थकांची भावना झाली आहे. ईडीच्या चौकशीतून बाहेर पडण्यासाठी खासदार गवळी कधीतरी भाजपच्या गोटात जातील, अशी शक्यताही वारंवार वर्तविली जात होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी बंड करताच भावना गवळी यांनी शिंदे यांना समर्थन देणारे पत्र प्रसिद्ध केले.



