वडगाव मावळ :- पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह इच्छुकांवरही करवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे मावळ तालुका ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी तालुकाक्ष गणेश खांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी पक्ष सोडला, विरोधी पक्षात सामील होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर व पक्षाच्या उमेदवारावर टीका केली. त्याच नेवाळे यांच्या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुक मंडळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीने नेवाळे यांना जिल्हा दूध संघावर संधी दिली, संपूर्ण पक्षच ताब्यात दिला. परंतु, याचा गैरफायदा घेऊन नेवाळे यांनी स्वार्थी राजकारण केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांची उमेदवारी जाणीवपूर्वक काटली. त्यामुळे पंचायत समितीची हातात येणारी सत्ता गेली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात सामील होऊन राष्ट्रवादीला विरोध केला.
वास्तविक, पक्षाने भरभरून दिले असताना सतत पक्षविरोधी काम करून पक्ष अडचणीत असताना पक्ष सोडून दिला, दुसऱ्या पक्षात प्रवेश केला, आताही ते दुसऱ्या पक्षात आहेत. मग राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांना गरज का? त्यांना निमंत्रण का दिले? असा सवाल आंद्रे यांनी केला आहे. तसेच नेवाळे यांच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




