उपासना करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही जण मोठमोठ्याने स्तोत्र म्हणतात, काही जण मनातल्या मनात म्हणतात. काही जणांना तास दोन तास पूजा केल्याशिवाय समाधान मिळत नाही तर काही जण देखल्या देवा दंडवत करून मोकळे होतात. व्यक्ती तितक्या प्रकृती! अशात काही नवशिक्यांचा गोंधळ होतो, की उपासनेची नेमकी पद्धत कोणती?
याबाबतीत अनेक संतांनी, आध्यात्त्म मार्गातील अधिकारी पुरुषांनी मार्गदर्शन केलेले आहे. व्याख्याता धनश्री लेले ‘सांगे कबीर’ या व्याख्यानातून संत कबीरांचे या संदर्भात असलेले विचार मांडतात- साधना गुप्त असावी असे म्हणतात. अर्थात त्याचे प्रदर्शन नको..! त्यादृष्टीने अनेक भाविक जपमाळ पिशवीत ठेवून जप करतात. जेणेकरून तो इतरांना कळू नये.
वास्तविक पाहता पिशवीतील माळ दिसत नसली तरी जपमाळ ओढणे सुरू असल्याची क्रिया बाहेर प्रत्येकाला कळते. यावरून ती क्रिया गुप्त आहे असे समजावे का? तर संत कबीर म्हणतात, की माळ नुसती घालून उपयोग नाही, ती फिरलीही पाहिजे. फिरणाऱ्या मण्यांबरोबर देवाचं नावंही घेतले गेले पाहिजे. नाव नुसते घेऊन उपयोग नाही तर ‘मनका मणका फेर’ अर्थात प्रत्येक मण्याबरोबर मनही नाम:स्मरणात गुंतले गेले पाहिजे.
म्हणजे हाताने जपमाळ ओढणे सुरु आहे, मुखाने नाव घेणेही सुरू आहे पण मन स्थिर नसेल आणि विषयात गुंतले असेल तर अशा नाम घेण्याचा काहीच उपयोग नाही. कबीरांना अपेक्षित असलेला जप कोणता, तर ‘ ना जीभ फिरे ना मन डोले’ म्हणजेच वरवर नाव न घेता ते इतके मनापासून घेतले गेले पाहिजे की जीभ स्थिर असेल, मन स्थिर असेल तरी नामःस्मरण सुरू असेल. त्यासाठी अनुसंधान हवे. तेही कसे त्याचेही उदाहरण कबीर देतात –



