पिंपरी, दि. ३० जून :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय विभागातील विविध रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्याकरीता घेण्यात आलेल्या परीक्षेचा पदनिहाय निकाल www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. याबाबत संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले आहे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील क्ष किरण शास्रज्ञ, टी.बी. अँड चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, स्टाफनर्स, सांख्यिकी सहाय्यक, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि ए.एन.एम. या अभिनामाची रिक्त पदे भरण्याकरीता महापालिकेकडून रितसर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदांसाठी दि. २५ जून २०२२ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली आहे. या परीक्षेचा पदनिहाय निकाल महापालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
या पदांच्या नेमणूका करण्यासाठी जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याकरीता आरक्षणनिहाय उमेदवारांच्या नावांसह वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर निवेदनाद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. त्याबाबत उमेदवारांना कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. संकेतस्थळावरील सूचना पाहिल्या नाहीत या कारणास्तव आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्टपणे कळविण्यात आले आहे.




