नागपूर दि. १ जुलै : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून देवेंद्र फडणवीसांनी केलेला त्याग संपूर्ण राज्यात चर्चेचा, तर भाजप कार्यकर्त्यांसाठी कौतुकाचा विषय आहे. याचवेळी फडणवीस यांचे नागपुरातील खंदे समर्थक व माजी महापौर संदीप जोशी यांनी त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर अमित शहा यांचे छायाचित्र वापरले नसल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
संदीप जोशी हे माजी महापौर, सत्तापक्ष नेते तसेच स्थायी समिती अध्यक्ष होते. ते फडणवीसांचे खंदे समर्थक आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेसच्या अभिजित वंजारीकडून ते पराभूत झाले होते. तेव्हा त्यांचा गेम केल्याची चर्चा होती. तर आता अमित शहा यांनी फडणवीसांचा गेम केल्याची चर्चा आहे. संदीप जोशी यांनी लावलेल्या बॅनरवर “देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस… अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर अमित शहा वगळून इतर सर्वांची छायाचित्र लावली आहेत.



